Friday, August 18, 2017

मराठयांनो (बहुजनांनो) बुध्द आपलेच ...भाग २

  संत तुकाराम हे कुणबी मराठा पण त्यांनी बुध्दाचे महत्व ,आपले सांस्कृतिक संबंध, आपली नाळ,  आपल्या हृदयातील स्पंदन, बुध्द म्हणजेच विठ्ठल हे चांगल्याप्रकारे जाणले होते.

बुध्दांना बोधी प्राप्त झाल्यावर ते दुःखमुक्तीचा उपदेश करण्यासाठी पंचेचाळीस वर्षे पायी चालत राहिले. पावसाळ्याच्या काळात मात्र ते चारिका थांबवून एखादया ठिकाणी वास्तव्य करत. वर्षासन सुरू होणे व संपणे या सुमारास लोक बुध्दांच्या दर्शनास जात.या घटनेचे रूपांतर आषाढी व कार्तिकी वारीमध्ये झालेले दिसते.

विठ्ठल म्हणजे बुध्द.

या संदर्भित डॉ.रा.चि.ढेरे यांच्या " श्री विठ्ठल एक महासमन्वय" या ग्रंथातील पुढील विवेचन पहा. " मराठी संत साहित्यात विठ्ठल हा बुध्द असल्याची धारणा वारंवार स्पष्ट शब्दात प्रगट झाली आहे. तशीच ती महाराष्ट्रात चित्र व शिल्प या माध्यमातूनही प्रगट झालेली दिसते..पूर्वी जी पंचाग छापत त्यात दशावतराच्या नवव्या स्थानी सर्वत्र न चुकता विठ्ठलाचे चित्र छापीत व त्याबाबतीच शंका राहू नये म्हणून त्या चित्रावर बुध्द लिहित दशावतारात बुध्दाच्या जागी विठ्ठल असल्याची किमान दोन शिल्प आहेत. तासगाव येथे विंचूरकरांनी बांधलेल्या गणेश मंदिराच्या गोपूरावर व दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील एका ओवरीत."

स्वतः तुकारामांचा बुध्द व विठ्ठल एकच असल्याचा एक अभंग आहे.

बौध्यअवतार माझिया अदृष्टा ।
मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।
............4160.1.4

तुकारामांनी बौध्द ग्रंथाचा मराठीत अनुवाद करून घेतला.

अश्र्वघोष हे इ.स च्या पहिल्या शतकात होवून गेलेले एक विख्यात महाकवी व बौध्दतत्ववेत्ते..याच्या वज्रसूची या ग्रंथाने वर्णव्यवस्थेचे जोरदार खंडन केले आहे. तुकारामांनी  बहिणाबाईंना या ग्रंथाचे मराठीत अनुवाद करायला सांगितले होते. तुकारामांनी बुध्द उत्कटतेने अनुभवला असल्याने तुकारामांच विचार हे जणू बुध्दांचेच विचार या अर्थी काढलेले उदगार बघा.

कलियुगीं हरी । बौध्दरूप धरी ।
तुकोबाशरीरीं। प्रवेशला ।।

तुकोबांच्या तोंडून साक्षात बुध्दच बोलत आहेत हे जेव्हा बहिणाबाई म्हणतात...तेंव्हा तरी बाबांनो आपण सुधारायला हवे का नको..तुकोबा बुध्दांनी दिलेला जीवनदर्शनाचा वारसा चालवित असल्याचे सांगतात आणि आपण करंटे बुध्दांना दूर सारून श्रावण, श्रावण खेळत सत्यनारायण घालत आहोत..अरं कुठ फेडताल पापं...उघडा डोळे..बघा नीट...तुकोबांसारखा जगदगुरू ज्याचे उपकार मानतो...त्याचं तरी ऐकताल का नाही?

                          क्रमशः

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
दिनांक १७.०८.२०१७

Wednesday, August 16, 2017

मराठयांनो (बहुजनांनो) बुध्द आपलेच. भाग १


बुध्द व्हा म्हणजे बुध्द धर्मच स्विकारा असं लगेच मला म्हणायचे नाही पण बुध्द होणे म्हणजे जीवनाला दिशा देणे, उन्नत होणे, विकसित होणे, मानवतेच्या अधिक जवळ जाणे..बुध्द हा धर्म नसून जीवन सुनियोजित जगण्याचा मार्ग आहे.

शिव व बुध्द एकरूपच

भारतामध्ये मुख्यतः ब्राम्हणी व अब्राम्हणी म्हणजेच वैदिक व अवैदिक विचारधारा आढळते..वैदिक धर्म भारतात येण्यापूर्वी हरप्पा व मोहोनजदडो येथील असूर, अवैदिक संस्कृती विकसित होती. यासच पुढे श्रमण परंपरा असे नाव मिळाले. सिंधू संस्कृतीत आढळलेला ध्यानस्थ पुरूष शिव आहे असे बहुसंख्य अभ्यासकांचे मत आहे. तोच श्रमणपरंपरेचा ज्ञात असा आदयपुरूष असे म्हणावे लागेल. शिवापासून आलेली योग साधना मूळच्या अवैदिक अशा सांख्य आणि योग या दर्शनामध्ये व्यक्त झाली. ही परंपरा तथागतांना नक्कीच ज्ञात होती. स्वतः तथागतांनी ध्यानाला खुप महत्व दिले आहे.

बळीराजा व बुध्द

आपला महान पुर्वज बळीराजा हे सिंधु संस्कृतीचे महत्वाचे अपत्य. प्रल्हादाचे दोन पुत्र एक कपिल व दुसरा विरोचन. बळीराजा विरोचनाचा पुत्र. विरोचनाचा पुत्र म्हणून त्यास वैरोचनी म्हणतात. बौध्द परंपरेत जे पाच ध्यानी बुध्द मानले जातात त्यात मध्यभागी वैराचनी बुध्द आहे. महाभारतानेही बळीराजाला बुध्द म्हटले आहे.  गोतम बुध्दांच्या नगरीचे नाव देखिल कपिलवस्तुच आहे.

पूर्वबुध्द

गोतमबुध्दांपूर्वी २४ बुध्द झाले असून गोतम हे पंचविसावे बुध्द आहेत असे मानणारी एक बुध्द परंपरा आहे. बुध्दवंश हाच आपला वंश असल्याचे तथागतांनी वडीलांना म्हटले होते. सिध्दार्थ स्वतः क्षत्रित कुळात जन्मले असून देखील आपल्या मूऴ परंपरेचा त्यांना विसर पडला नव्हता.

आपणास मात्र तो विसर पडला आहे...आपली मूळ अवैदिक परंपरा , श्रमण संस्कृती, बुध्द परंपरा आपण विसरलो आहोत...काल्पनिक देवता, ओवळे सोवळे, अंधश्रध्दा याच्या नादी लागून बुध्दत्वा पासून दूर चाललो आहोत..ज्या वैदिक संस्कृतीची आपण आज पूजा करतो तिची बहुतांशी तत्वे ही बौध्द परंपरेतूनच आलेली आहेत.. शिवापासून चालत आलेली, कपिलमुनीनी विकसित केलेली, बळीराजा, विरोचन यांनी जपलेली व बुध्दांनी कळस चढवलेली श्रमण परंपरा आपल्यालाच पुढे न्यायची आहे.....तर मराठयांनो, बहुजनांनो जात, पात सोडा व आपले मूळ असलेल्या शिव बुध्द- श्रमण परंपरेकडे चला.

शिवदेवे रचिला पाया
बुध्द झालासी कळस.

Saturday, July 8, 2017

गुरूशिष्यपण । हे तो अधमलक्षण

भारतभूमीत गुरू शिष्यांविषयी अनेक कथा, कादंब-या प्रचलित आहेत....अत्यंत प्रामाणिकपणे ज्ञानार्जण करणारे व देणारे गुरू शिष्य जसे आहेत तसेच एकलव्याचा अंगठा मागून गुरू पदाला बदनाम करणारे गुरूही आहेत.....

तुकाराम महाराजांनी गुरू शिष्यांविषयी अत्यंत जहाल भूमिका घेतली आहे.....त्यांनी कधी कोणताही गुरू केला नाही की कोणाला शिष्य केलं नाही......पाऊस ज्या प्रमाणे सर्वत्र वर्षा करतो त्याचप्रमाणे जाणत्या माणसाने आपले अनुभव पात्र.अपात्र न पाहता सर्वांना दयायला पाहिजे....अशी त्यांची सडतोड भूमिका होती....

आज सर्वत्र कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गल्लो  गल्ली उगवलेले बापू, स्वामी, गुरू, सदगुरू, साधू, साधवी त्यांचे आश्रम, मान, सन्मान, मोठेपणा, हार, तुरे बघितले की तुकारामबुवांचे विचार पटतात....
अशा गुरू शिष्यांविषयी बुवा म्हणतात.

तुका म्हणे चेला । गुरू दोघे ही नरकाला ।।

ज्या ठिकाणी प्रवचन करायचे तेथे हार,सत्कार एवढंच कशाला बैलाला चारापणी देखील घ्यायचे नाही..इतकी स्पष्ट,  निरपेक्ष भूमिका तुकारामांनी घेतली आहे...

मने तेचि गुरू। मने तेचि शिष्य
करे आपलेची दास्य।।
मीचि मज व्यालो । पोटा आपुलिया आलो।।

या अभंगातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.....माझे मन हेच गुरू व तेच शिष्य झाले....मनातील भाव निर्मळ होऊन,  मीपणा गेला व मीच माझे पोटी जन्माला आलो......

गुरू, देव यांच्या वर्तनालाही नैतिकतेची कसोटी लावता आली पाहिजे...बळीला पाताळात घालणारा वामन, एकलव्याचा अंगठा मागणारा द्रोणाचार्य़. राजा शिबी, नळ दमयंती,  राजा हरिश्र्चंद्र यांच्या जीवना काटे पेरणा-यांना संत किंवा देव कसे म्हणावे.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।
तोचि साधु ओळखावा। देव तेथेची जाणावा ।।

हे ज्याला कळले त्यास कोणत्याच गुरूची गरज नाही.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पा.
7798981199

Saturday, June 24, 2017

ती

माझे प्रेम,

तसा मी शादीशुदाच पण प्रेमाचा भुकेला....कॉलेज जीवनात सायकलवरून फिरणा-या मला कधी स्वप्नसुंदरी गवसलीच नाही...एके दिवशी अचानक ती परी प्रत्यक्ष नजरेस पडली...अनेक वर्षाच्या सुकलेल्या मनाला पालवी फुटली,  जीव जडला...इतका की तिचं असणं हेच जीवन झालं...तीची स्वप्न हीच माझी स्वप्न झाली, तिझं रूसणे  -माझे सॉरी म्हणणे, तुचे चिडणे - मी चूक कबुल करणे मला आवडू लागले....

तिचे फॅशनेबल राहणे, सुंदर दिसणे, मॉडर्ऩ दिसणे..माझ्याबरोबर बागडणे, लडीवाळपणे हट्ट करणे...मी ते पूर्ण करणे.....सगळंच कसं मंतरलेल...कुणाची पर्वी नाही की समाजाची तमा नाही...

मी तिच्याबरोबर असताना कधीच समाजाचा विचार केला नाही..कारण मला काही सिध्द करायचे नव्हते...तिचे असणे हाच श्वास होता..ती कधी, कुठे काय करत असेल हे मी न बोलताही सांगू शकत होतो...इतके आमचे नाते विश्वासू, परिपक्व व पारदर्शी होते..जीवनात मोहाचे प्रसंग अनेक आले...पण तीचे माझ्यावर अवलंबून असणे मला कधीच चुकीच्या मार्गीला जावू देत नव्हते..तीही तितकीच प्रामाणिक...असे प्रेमाची आठ वर्षे आनंदाने गेली...खूप प्रगती केली, चांगले विचार केले, सर्वांना मदत केली.....विचारांनी आणि अनुभवांनी समृध्द झालो....खूप वचने दिली घेतली...तीच्या साठी जगताना माझे स्वतंत्र असित्वच तिच्यात विलिन करून टाकले....तिच्या आनंदातच मीही मनापासून बहरलो... *यात कुठेही उपकराची किंवा तीला मिंद करण्याचा विचार नव्हताच* कारण तिच्याशिवाय माझे अस्तित्वच संपले होते...

माझ्याशी लग्नाचा विचार तिनंही खूप वेळा बोलून दाखवला...पण मला कधी या बंधनाची, समाजमान्यतेची गरजच वाटली नाही...खरं सांगयच तर मी तिला माझ्या सख्या पत्नीपेक्षाही जास्त प्रेम व दर्जा दिला होता...आणि आयुष्यभर तिची काळजी करण्याचा मनोमन निश्चय ही केला होता.....

पण तिच्या लग्नाच्या भावनेला एका परपुरूषाने प्रतिसाद दिला...तिलाही ते भावले....साद...प्रतिसादाचा खेळ सुरू झाला.....गुंतागुंत वाढत गेली....

पहिला प्रियकर स्तब्धच झाला....अघटित घडलेल्या प्रकाराने विस्कटून गेला....तिच्या परत येण्यासाठी तडफडू लागला....नाना परिने तिला समजावू लागला....पण तीचे मन आता रमेना...तो एकटाच...अनंत स्वप्ने विस्कटून विव्हळत राहू लागला...त्याचा दोष त्यालाच कळेना....तिचे रूड वागणे त्यास अस्वस्थ करू लागले...एकेकाळी तिची क्षणाक्षणाची बातमी सांगणारा तो...ती सध्या काय करते हे विचारू लागला....तिचे फोन व मेसेज करू नको हे सांगणे त्यासाठी मनोविश्व उध्वस्त करणारे होते...तिचे दुस-यात रमणे हे त्याच्या विचारातच कधी नव्हते.....

एकाच वेऴी तिचा वडील, मित्र, प्रियकर, मुलगा या भूमिका हसत हसत पार पाडणारा तो...तिच्या अशा वागण्यामुळे पार गोंधळून गेला....

त्यांनी एकमेकांना नेहमीच सावरले, पण आज तीचे वेगळेच विश्व निर्माण झाले..त्याचे विश्व मात्र तिच राहिली..

आज तिला त्यास भेटायला वेळचं नाही...सहज जाता जाता भेटताना बोलली की " मी चुकीच्या मार्गाला तर जाणार नाही ना याची भिती वाटते "

तिचे हे म्हणणे ऐकूण तो मात्र मुळापासून हादरला...कायम चांगले विचारांसह तिला सोबत करणारा तो...खरंच खूप दुःखी झाला.....

आणि मनोमन पुटपुटला

तुझा.......असताना.तो तुला वाईट मार्गाला कसा जावून देईल....पण गरज आहे ती विश्वास निर्माण करण्याची....समाज काय म्हणेल यापेक्षा आपली मने काय म्हणतात हे जाणण्याची...

स्वप्नात भरारी मारण्यापेक्षा जमिनीवरील घरटयाचा आधार शोधण्याची....

Tuesday, May 30, 2017

Saturday, May 27, 2017

संजय सर लेख विचारसरणी

कोणी कोणत्या विचारसरणीचे असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विशिष्ट विचारसरणीचे म्हणवून घेणा-यांनाही ती विचारसरणी समजलेली असते असे म्हणणे धारिष्ट्याचे आहे. बव्हंशीवेळा भंपकांचाच भरणा कोणत्याही विचारधारेत अधिक असल्याचे दिसते. या भंपकांमुळे मूळ विचारसरणी, मग ती कोणतीही असो, साध्यापासून ढळत जात अस्तांचलाकडे वाट चालू लागते. कोण आधी आणि कोण नंतर एवढेच काय ते ठरायचे बाकी असते.

आज आपण सारेच प्रतिक्रियावादी झालो आहोत. पुरोगामी म्हणवणा-या वर्गात तर हे प्रमाण चिंता वाटावी एवढे मोठे झाले आहे. कोणतीही विचारसरणी सत्तेत आली की ती आपल्या विचारांच्याच लोकांची काळजी घेणार हे उघड आहे. कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा साहित्यिक संस्थाही आपापल्या विचारसरणीचेच ढोल बडवणार हेही उघड आहे. त्यांनी काहीही केले की विरोधी विचारसरणीही ढोल बडवू लागते व या ढोलबडवीच्या गदारोळात मुलभूत प्रश्न बाजुलाच पडतात. रोज कोणीतरी काहीतरी बरळते. कोठे ना कोठे काही ना काही घटना घडते. बाजुने वा विरोधात लगेच गदारोळ सुरु होतो. कृती काय करायची याचा मात्र संभ्रम सुटत नाही. प्रतिक्रियावादी व्हायचे की प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतील अशा सकारात्मक कृती करायच्या हा प्रश्न मात्र दुरच राहून जातो.

भारतीय राजकारणात आज एक विचित्र तिढा आहे. भाजप सत्तेवर आहे हे त्याचे कारण नसून विरोधी पक्षच अस्तित्वशून्य झालेत हे खरे कारण आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला संधी मिळावी एवढे उदंड मुद्दे सध्याचे सरकार देत असतांना त्यावर आवाज तर सोडा...साधी कुईही ऐकायला येत नाही. ते कशाला घाबरले आहेत? अशा कोणत्या त्यांच्या फाइल्स त्यांना आवाज उठवण्यापासून रोखत आहेत? की त्यांना देशातील स्थिती अत्यंत उत्तम आहे असा समज सत्ताधारी पक्षाने करवून दिला आहे? संधी नसतांनाही संधी शोधणारे राजकारणी असतात. आज तर त्यांची रेलचेल आहे. पण त्याचा कसलाही लाभ पदरात पाडून घ्यायला कोणी सज्ज दिसत नाही.

सत्ताधा-यांनी निर्माण केलेल्या गारुडात कट्टर विरोध करणारे, करू पाहणारे विचारवंतही या तिढ्यातून सुटलेले नाहीत. जगात अनेक विचारसरण्या असतात. त्यांचे सहअस्तित्व मान्य करावेच लागते. पण विचारसरण्यांतील संघर्ष जिंकतो तो विचारसरनीचे तत्वज्ञान किती प्रबळ आहे आणि ते कितपत लोकांपर्यंत पोहोचवता येते यावर ठरते. प्रतिक्रियावादी विचारवंतीय लेखन वाचून साध्य काय होणार? दोषदिग्दर्शन होईल हे खरे आहे पण त्याला पर्यायी मार्ग कसा मिळेल? रस्ता खराब आहे. तो अमुकमुळे खराब झाला. हे कोणी सांगून काय उपयोग? त्यावर चालणा-या प्रत्येकाला ते माहितच आहे. तुम्ही नवा रस्ता देता का..तर बोला अशीच प्रतिक्रिया येणार हे उघड आहे.

संघवादी विचारसरणी आपली पाळेमुळे घट्ट रोवत चालली आहे. त्यांच्याच विचारांचे सरकार असल्याने ते तसेच होणार हे गृहित धरायला हवे. तसे न करतील तर त्यांना मुर्खच म्हणायला हवे. संघवादाशी संघर्ष हा केवळ राजकीय नाही तर तो सांस्कृतिक, धार्मिक , आर्थिक आणि सामाजिक तत्वज्ञानाच्या पातळीवर लढावा लागेल. उपटसुंभी नेत्यांच्या बोलांना व मुर्ख क्रियांना फक्त प्रतिक्रिया देत बसले तर हा संघर्ष कधीही संपणार नाही, उलट तो दिवसेंदिवस जगड्व्याळ होत सर्वव्यापी बनेल आणि त्यात हार कोणाची होणार हे सरळ आहे. राजकीय पराभव हा विचारसरणीचाही पराभव असतो हे मान्य करावे लागते. संघविरोधी विचारवंतांनी यावर कितपत विचार केला आहे? आपल्या तत्वज्ञानाची मुळे जे गांधीवादात शोधत आहेत त्याच गांधीजींचे अपहरण का होत आहे यावर विचार कोण करणार? बाबासाहेबांचे काय होत आहे? राजकीय आकांक्षा असणारे अनेक समाजघटक आजही नेत्याच्या शोधात आहेत, हे चित्र काय सांगते?  

म्हणजे आम्हीच सैरभैर झालो आहोत. अनेक संधीसाधू, मग ते विचारवंत असोत की राजकीय, आधीच संघ-जलात नहात पवित्र झाले आहेत. प्रबळ विरोधी पक्ष नसणे ही मोठी समस्या नसून प्रभावी विरोधी विचारवंत नाहीत ही जास्त मोठी शोकांतिका आहे. ते प्रभावी होत नाहीत कारण तत्वज्ञानाची सुसंगत फेरमांडणी करण्यात अपयश आले आहे. सबळ तत्वज्ञानाच्या पायाखेरीज कोणतीही वैचारिक अथवा समाज-सांस्कृतिक चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. गांधीजींचे यश हे त्यांच्या तत्वज्ञानात होते. गांधीजींचा जप करून अणि त्यांच्या खुन्याचे रोज शिवीरुपात नामस्मरण करून गांधीवादी होता येत नाही. आजच्या वर्तमानासाठी आवश्यक कालसुसंगत तत्वज्ञान व त्यावर आधारित चळवळ उभी करावी लागते. अन्यथा गांधीजींचे नांव घ्यायला अथवा त्यांचे अपहरणही करायला फारशा बुद्धीमत्तेची गरज लागत नाही.

ज्यांना काही उभे करता येत नाही त्यांना प्रतिक्रियावादी होणे सोपे जाते. समाजमाध्यमांमुळे तर प्रतिक्रियांचा पाऊस पाडता येतो. पण त्यामुळे समाजमन बदलत नाही. आज विरोधी पक्ष संपल्यासारखे दिसत असतांना ते एवढी अपयशे गाठीला जमा असुनही मोदींकडेच आशेने पहात असतील तर लोकांचा काय दोष? असंवेदनाशील भडभुंज्या नेत्यांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी त्यांना रोखणार कोण? मुळात समाजमनाची वैचारिक मशागत करण्यासाठी आम्ही काय केले आहे हा प्रश्न तर पडायलाच हवा. आज काही विचारवंतही विरोधाच्या नादात उन्मादी होतात पण समस्येच्या मुळाशी जात मग नंतरच त्याचे विश्लेशन करावे अथवा प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना समजत नाही. समाजमाध्यमांच्या झटपट प्रसिद्धीमुळे तेही बिघडले आहेत की काय हा प्रश्न पडतो. पण त्यामुळे समाजाचे प्रश्न त्यामुळे सुटत नाहीत. उद्याची आशा त्यांना यातून मिळणार नाही. भविष्यातील समस्यांशी लढण्याची उमेद मिळणे ही तर फार दुरची बाब झाली.

आपल्या समस्यांची मुळे मुळात आपल्या समाजविचारदुष्काळात आहेत हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. सरकारे येतील व जातील, पण हा दुष्काळ असाच राहिला तर स्थितीत काही फरक पडेल असे नाही. आज संघवादाचा डंका पिटला जात असेल तर उद्या कोंग्रेसवादाचा वा साम्यवादाचा पिटला जाईल. पण त्यामुळे आमचे आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत. उन्न्हीस-बीस फरकच काय तो राहील. याचे कारण म्हणजे हे प्रश्नच एवढ्या गुंतागुंतीचे बनवले गेले आहेत की त्यांच्या मुळाशी न जाता वरवरची सोपी व भावनिक उत्तरे शोधण्यातच सर्वांना रस आहे. जो आकर्षक वेष्टणे वापरतो तो जिंकतो. विरोधकांकडे वेष्टणे तरी आहेत की नाही हा प्रश्न आहे. त्यांना दबावाखाली आणून गप्प बसवले गेले असेल व ते बसत असतील तर मग नशीबाच्या हवाल्यावर राहणेच योग्य असे कोणीही म्हणेल!

समस्या विचारवंतांची आहे. आज त्यांचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. तेही कंपुवादात अडकलेत की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. नवविचारांना समाज आज पारखा झाला आहे. त्यामुळे जर तो विगतवासी स्वप्नांच्या मोहात अडकत जात असेल तर कोणाला दोष देणार? वर्तमानाला भारुन टाकणारे नवविचार आपल्याला हवे आहेत व विचारवंतांनीच त्यावर आत्मपरिक्षण करायला हवे. अन्यथा अंधारयूग दूर नाही हे पक्के समजून चालावे.