Friday, August 18, 2017

मराठयांनो (बहुजनांनो) बुध्द आपलेच ...भाग २

  संत तुकाराम हे कुणबी मराठा पण त्यांनी बुध्दाचे महत्व ,आपले सांस्कृतिक संबंध, आपली नाळ,  आपल्या हृदयातील स्पंदन, बुध्द म्हणजेच विठ्ठल हे चांगल्याप्रकारे जाणले होते.

बुध्दांना बोधी प्राप्त झाल्यावर ते दुःखमुक्तीचा उपदेश करण्यासाठी पंचेचाळीस वर्षे पायी चालत राहिले. पावसाळ्याच्या काळात मात्र ते चारिका थांबवून एखादया ठिकाणी वास्तव्य करत. वर्षासन सुरू होणे व संपणे या सुमारास लोक बुध्दांच्या दर्शनास जात.या घटनेचे रूपांतर आषाढी व कार्तिकी वारीमध्ये झालेले दिसते.

विठ्ठल म्हणजे बुध्द.

या संदर्भित डॉ.रा.चि.ढेरे यांच्या " श्री विठ्ठल एक महासमन्वय" या ग्रंथातील पुढील विवेचन पहा. " मराठी संत साहित्यात विठ्ठल हा बुध्द असल्याची धारणा वारंवार स्पष्ट शब्दात प्रगट झाली आहे. तशीच ती महाराष्ट्रात चित्र व शिल्प या माध्यमातूनही प्रगट झालेली दिसते..पूर्वी जी पंचाग छापत त्यात दशावतराच्या नवव्या स्थानी सर्वत्र न चुकता विठ्ठलाचे चित्र छापीत व त्याबाबतीच शंका राहू नये म्हणून त्या चित्रावर बुध्द लिहित दशावतारात बुध्दाच्या जागी विठ्ठल असल्याची किमान दोन शिल्प आहेत. तासगाव येथे विंचूरकरांनी बांधलेल्या गणेश मंदिराच्या गोपूरावर व दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील एका ओवरीत."

स्वतः तुकारामांचा बुध्द व विठ्ठल एकच असल्याचा एक अभंग आहे.

बौध्यअवतार माझिया अदृष्टा ।
मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।
............4160.1.4

तुकारामांनी बौध्द ग्रंथाचा मराठीत अनुवाद करून घेतला.

अश्र्वघोष हे इ.स च्या पहिल्या शतकात होवून गेलेले एक विख्यात महाकवी व बौध्दतत्ववेत्ते..याच्या वज्रसूची या ग्रंथाने वर्णव्यवस्थेचे जोरदार खंडन केले आहे. तुकारामांनी  बहिणाबाईंना या ग्रंथाचे मराठीत अनुवाद करायला सांगितले होते. तुकारामांनी बुध्द उत्कटतेने अनुभवला असल्याने तुकारामांच विचार हे जणू बुध्दांचेच विचार या अर्थी काढलेले उदगार बघा.

कलियुगीं हरी । बौध्दरूप धरी ।
तुकोबाशरीरीं। प्रवेशला ।।

तुकोबांच्या तोंडून साक्षात बुध्दच बोलत आहेत हे जेव्हा बहिणाबाई म्हणतात...तेंव्हा तरी बाबांनो आपण सुधारायला हवे का नको..तुकोबा बुध्दांनी दिलेला जीवनदर्शनाचा वारसा चालवित असल्याचे सांगतात आणि आपण करंटे बुध्दांना दूर सारून श्रावण, श्रावण खेळत सत्यनारायण घालत आहोत..अरं कुठ फेडताल पापं...उघडा डोळे..बघा नीट...तुकोबांसारखा जगदगुरू ज्याचे उपकार मानतो...त्याचं तरी ऐकताल का नाही?

                          क्रमशः

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
दिनांक १७.०८.२०१७

Wednesday, August 16, 2017

मराठयांनो (बहुजनांनो) बुध्द आपलेच. भाग १


बुध्द व्हा म्हणजे बुध्द धर्मच स्विकारा असं लगेच मला म्हणायचे नाही पण बुध्द होणे म्हणजे जीवनाला दिशा देणे, उन्नत होणे, विकसित होणे, मानवतेच्या अधिक जवळ जाणे..बुध्द हा धर्म नसून जीवन सुनियोजित जगण्याचा मार्ग आहे.

शिव व बुध्द एकरूपच

भारतामध्ये मुख्यतः ब्राम्हणी व अब्राम्हणी म्हणजेच वैदिक व अवैदिक विचारधारा आढळते..वैदिक धर्म भारतात येण्यापूर्वी हरप्पा व मोहोनजदडो येथील असूर, अवैदिक संस्कृती विकसित होती. यासच पुढे श्रमण परंपरा असे नाव मिळाले. सिंधू संस्कृतीत आढळलेला ध्यानस्थ पुरूष शिव आहे असे बहुसंख्य अभ्यासकांचे मत आहे. तोच श्रमणपरंपरेचा ज्ञात असा आदयपुरूष असे म्हणावे लागेल. शिवापासून आलेली योग साधना मूळच्या अवैदिक अशा सांख्य आणि योग या दर्शनामध्ये व्यक्त झाली. ही परंपरा तथागतांना नक्कीच ज्ञात होती. स्वतः तथागतांनी ध्यानाला खुप महत्व दिले आहे.

बळीराजा व बुध्द

आपला महान पुर्वज बळीराजा हे सिंधु संस्कृतीचे महत्वाचे अपत्य. प्रल्हादाचे दोन पुत्र एक कपिल व दुसरा विरोचन. बळीराजा विरोचनाचा पुत्र. विरोचनाचा पुत्र म्हणून त्यास वैरोचनी म्हणतात. बौध्द परंपरेत जे पाच ध्यानी बुध्द मानले जातात त्यात मध्यभागी वैराचनी बुध्द आहे. महाभारतानेही बळीराजाला बुध्द म्हटले आहे.  गोतम बुध्दांच्या नगरीचे नाव देखिल कपिलवस्तुच आहे.

पूर्वबुध्द

गोतमबुध्दांपूर्वी २४ बुध्द झाले असून गोतम हे पंचविसावे बुध्द आहेत असे मानणारी एक बुध्द परंपरा आहे. बुध्दवंश हाच आपला वंश असल्याचे तथागतांनी वडीलांना म्हटले होते. सिध्दार्थ स्वतः क्षत्रित कुळात जन्मले असून देखील आपल्या मूऴ परंपरेचा त्यांना विसर पडला नव्हता.

आपणास मात्र तो विसर पडला आहे...आपली मूळ अवैदिक परंपरा , श्रमण संस्कृती, बुध्द परंपरा आपण विसरलो आहोत...काल्पनिक देवता, ओवळे सोवळे, अंधश्रध्दा याच्या नादी लागून बुध्दत्वा पासून दूर चाललो आहोत..ज्या वैदिक संस्कृतीची आपण आज पूजा करतो तिची बहुतांशी तत्वे ही बौध्द परंपरेतूनच आलेली आहेत.. शिवापासून चालत आलेली, कपिलमुनीनी विकसित केलेली, बळीराजा, विरोचन यांनी जपलेली व बुध्दांनी कळस चढवलेली श्रमण परंपरा आपल्यालाच पुढे न्यायची आहे.....तर मराठयांनो, बहुजनांनो जात, पात सोडा व आपले मूळ असलेल्या शिव बुध्द- श्रमण परंपरेकडे चला.

शिवदेवे रचिला पाया
बुध्द झालासी कळस.