Saturday, July 8, 2017

गुरूशिष्यपण । हे तो अधमलक्षण

भारतभूमीत गुरू शिष्यांविषयी अनेक कथा, कादंब-या प्रचलित आहेत....अत्यंत प्रामाणिकपणे ज्ञानार्जण करणारे व देणारे गुरू शिष्य जसे आहेत तसेच एकलव्याचा अंगठा मागून गुरू पदाला बदनाम करणारे गुरूही आहेत.....

तुकाराम महाराजांनी गुरू शिष्यांविषयी अत्यंत जहाल भूमिका घेतली आहे.....त्यांनी कधी कोणताही गुरू केला नाही की कोणाला शिष्य केलं नाही......पाऊस ज्या प्रमाणे सर्वत्र वर्षा करतो त्याचप्रमाणे जाणत्या माणसाने आपले अनुभव पात्र.अपात्र न पाहता सर्वांना दयायला पाहिजे....अशी त्यांची सडतोड भूमिका होती....

आज सर्वत्र कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गल्लो  गल्ली उगवलेले बापू, स्वामी, गुरू, सदगुरू, साधू, साधवी त्यांचे आश्रम, मान, सन्मान, मोठेपणा, हार, तुरे बघितले की तुकारामबुवांचे विचार पटतात....
अशा गुरू शिष्यांविषयी बुवा म्हणतात.

तुका म्हणे चेला । गुरू दोघे ही नरकाला ।।

ज्या ठिकाणी प्रवचन करायचे तेथे हार,सत्कार एवढंच कशाला बैलाला चारापणी देखील घ्यायचे नाही..इतकी स्पष्ट,  निरपेक्ष भूमिका तुकारामांनी घेतली आहे...

मने तेचि गुरू। मने तेचि शिष्य
करे आपलेची दास्य।।
मीचि मज व्यालो । पोटा आपुलिया आलो।।

या अभंगातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.....माझे मन हेच गुरू व तेच शिष्य झाले....मनातील भाव निर्मळ होऊन,  मीपणा गेला व मीच माझे पोटी जन्माला आलो......

गुरू, देव यांच्या वर्तनालाही नैतिकतेची कसोटी लावता आली पाहिजे...बळीला पाताळात घालणारा वामन, एकलव्याचा अंगठा मागणारा द्रोणाचार्य़. राजा शिबी, नळ दमयंती,  राजा हरिश्र्चंद्र यांच्या जीवना काटे पेरणा-यांना संत किंवा देव कसे म्हणावे.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।
तोचि साधु ओळखावा। देव तेथेची जाणावा ।।

हे ज्याला कळले त्यास कोणत्याच गुरूची गरज नाही.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पा.
7798981199