Monday, March 27, 2017

गुढीपाडवा प्रश्न उत्तरे

प्र. 1. गुढीपाडवा कोणत्या ऋतुत येतो.?

उत्तर. मराठी महिने 12. सुरवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र महिन्याचा महिला दिवस चैत्र प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. वर्षाच्या 12 महिन्यांचे मिळून, प्रत्येक दोन महिन्यांचा एक असे १२ ऋतू. चैत्र महिन्यात वसंत ऋतुचे देखिल आगमन होते. निष्पर्ण झालेल्या पानांना पालवी फुटते, विविध फुले मुक्तहस्ताने रंगाचा उधळण करतात. प्राचीन मानव निसर्गपूजक असल्याने निसर्गाच्या पुर्नजन्माचे व नवचैतन्याचे स्वागत करण्यासाठी पताका/तोरणे/गुढी तर उभारत नसेल ना?

प्र. २. बांबूचा गुढीसाठी वापर शुभ का अशुभ?

बांबू हा एक गवताचा प्रकार. बांबू भारतीय उपखंडात मोठयाप्रमाणावर आढळतो. टिकाऊ व लवचिकता यामुळे तो गुढीसाठी वापरला जातो. अनेक वस्तु,प्राणी,पक्षी काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानल्या आहेत. बांबूच्या बाबतीत अशुभापेक्षा शुभ मानण्याचे प्रमाण जास्त आहे. जोपर्यंत पृथ्वी सुर्या भोवती फिरत आहे व चंद्र, सुर्य आपले स्थान सोडत नाही तोपर्यंत पृथ्वीवरील सर्व गोष्टी शुभच आहेत. मयतासाठी बांबू वापरत असल्याने काही लोक बांबूस अशुभ मानतात, तथापी मयतासाठी फुल, तांदूऴ, अत्तर, निलगिरी, कापूस, कापड, माठ इ.सर्वच वापरतात व त्या वस्तू आपण इतर दैनंदिन कामासाठी वापरताना कुठे अशुभ मानतो.. द्वारकाधीश कृष्ण,  कान्हा असताना याच बांबूच्या बासरीचा उपयोग करायचा.

प्र.३. गुढी हा शब्द संस्कृत आहे का?

या शब्दाचा उगम संस्कृत भाषेत नसून, तो देशी भाषेत व बहुजनींच्या संस्कृतीत आहे. कानडी भाषेत 'ध्वज' या अर्थी 'गुडी' हा शब्द आला असून. नाडगुडी म्हणजे राष्ट्रध्वज असा कानडी भाषेत अर्थ होतो.

प्र.४. गुढीपाडव्याचा संबंध रामाचा रावणावरील विजयाशी आहे का?

अनेक जण असा संबंध जोडतात पण त्यास आधार मिळत नाही. रामाने रावणाचा पराभव केला, परत येताना परशुराम आडवा आला त्याचा पराभव करून राम वनवासातून परत आला, राज्याभिषेक झाला तेंव्हा लोकांनी ध्वज उभारले हे खरे आहे, पण तो दिवस गुढीपाडव्याचा नव्हता..

सिध्देश्र्वर शास्त्री चित्राव यांनी 'राम' नोंदीत पुढील प्रमाणे म्हटले आहे..

" वैशाक शुक्ल पंचमी राम के चौदा वर्ष वनवास की समाप्ती एवम् उसी दिन प्रयाग मे भारद्वाज आश्रम मे आगमन. वैशाख शुक्ल षष्ठी राम एवम भरत की पुनर्भेट, वैशाख शुक्ल सप्तमी रामका राज्याभिषेक."

प्रश्न. ५ गुढी पाडवा महाराष्ट्रात कधीपासून साजरा केला जातो.?

कानडी भाषेत गुडी हा शब्द महात्मा बसवेरश्र्वरांनी एका वचनात वापरला आहे. त्याचा काळ इ.स.1105 ते 1167  असा आहे.

ओडेयरू बंदडे गुडी तोरणव कट्टी

याचा अनुवाद श्री शंकर पाटील आणि नडकुट्टी यांनी खालील प्रमाणे केला आहे.
शरणांचे आगमन होता गुढया उभारून तोरणे बांधा. ( वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे गुढया व तोरणे हे दोन स्वतंत्र शब्द आले आहेत)

मराठी भाषेत गुढी हा शब्द इ.स. 13 व्या 14 व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.लीळाचरित्र, चोखामेळा अभंग, नामदेव अभंग, तुकाराम अभंग, ज्ञानेश्र्वरांच्या ओव्या यात गुढी शब्द वापरण्यात आले आहेत. ज्याअर्थी गुढी हा शब्द इतक्या वेळा वापरला गेला आहे त्याअर्थी या पाठीमागची संकल्पना देखिल दीर्घकाळ चालत आलेली असली पाहिजे.

प्र.६. गुढीपाडवा व शककालगणना यांचा संबंध काय?

इ.स 78 पासून 'शके' या कालगणनेस प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतकोषामध्ये शालिवाहन शकाविषयी पुढील प्रमाणे माहिती मिळते.

शक कालाचा संस्थापक शक राजा कोण व तो कोठे होऊन गेला या विषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. पुष्कळांच्या मते तो कुशाणवंशी कनिष्क असावा. हे राजे शकवंशी नसून कुशाणवंशी होते. या कालगणनेचा पुढे शक राजांनी वापर केल्यान् तिला शक असे नाव पडले असावे. शालिवाहन हे नाव इ.स.च्या १३ व्या शतकात त्याच्याशी जोडले गेले. हा शालिवाहन नेमका कोण. याविषयी मात्र अभ्यासक ठामपणे सांगताना दिसत नाहीत.तथापी तो कुंभाराचा मुलगा होता ही लोकभावना फार महत्वाची आहे.
या शक कालगणनेची सुरूवात चैत्र पाडव्या पासून होते.

प्र.,७ गुढीपाडवा व शंकर पार्वती

शिव व पार्वती यांचे महत्व वेदपूर्व काळापूर्वीपासून विख्यात आहे. सिंधू संस्कृतीतील उत्खननात पशुपती शिवाच्या व मातृदेवतेच्या मूर्ती सापडल्या आहेत..

भारतीय समाजाचा विचार करता, पार्वती व शंकर यांना आदि मातापिता मानण्याची श्रध्दा फार मोठ्या प्रमाणात आढळते.

कालीदास, तसेच अनेक प्राचीन ग्रंथांच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की, या आदय दांपत्याचा विवाह चैत्र प्रतिपदेच्या( पाडवा) दिवशी निश्चित होवून तो,  त्यानंतर तीन दिवसांनी पार पडला.

या दिवसांची तयारी करताना ग्रंथात म्हटले आहे, सर्व शहरच एक कुल असल्यासारखे कामाला लागले, राजरस्त्यांच्या बाजूला चिनी रेशमी वस्त्रांचे ध्वज रांगेने उभारले होते, जागोजागी तेजाने चमकणारी तोरणे होती. सगळीकडे आनंदोत्सव होता.

(चिनशी भारताचा व्यापार प्राचीन असून,  तो ज्या रस्त्याने चालायचा त्यास सिल्क रोड म्हणत)

महाभारत ते १४ व्या शतकातील विविध ग्रथांनी वर्षारंभाच्या पहिल्या दिवशी पार्वती पूजेच्या प्रसंगी व शिवपार्वती विवाह प्रसंगी ध्वज वा ध्वजा उभारण्याची कृती सांगितलेली आहे...

यावरून एक लक्षात येते की पाडवा हा सऩ अतिपुरातन असून, तो आदय मातापित्यांच्या विवाहाच्या आनंदाचे प्रतिक आहे

आता पर्यंत आपण पाहिल की, शिव व पार्वती यांच्या विवाहाचा व चैत्र महिन्याचा निकटचा संबंध आहे. चैत्र प्रतिपदेला शिवपार्वतीचा विवाह निश्चित होवून, त्यानंतर चौथ्या दिवशी त्यांचे लग्न झाले. चैत्र शुक्लपक्षातील पहिले हे नऊ दिवस पार्वतीचे नवरात्र म्हणून साजरे केले जातात.

महत्वाचे म्हणजे याच महिन्यातील अष्टमीला पार्वतीचा जन्म झाला.

नवमीला,  सर्व योगिनिंची अधिपती म्हणून अभिषेक करण्यात आला.

पंचमीला व षष्ठीला शिवाशी संबंधित असलेले महानाग, राक्षस, यातधान वगैरेंची पूजा आहे.

अनेक धार्मिक ग्रथांत शिवपार्वती विवाहाचा व चैत्र नवरात्रातयचा विस्तृत उल्लेख आहेत.

शिवपार्वतीचा विवाह वसंत ऋतुत, चैत्र शुक्लात होणे, त्याप्रित्यर्थ पताका, तोरणे लागणे, त्याचा विवाह हा आदय विवाह असून, तुमचे आमचे व आपल्या सर्व पूर्वजांचे विवाह त्या आदयविवाहाचे अनुकरण मानने यांस फार मोठे सांस्कृतिक मोल आहे.

प्र. ८. गुढीचे स्वरूप, उलटे भांडे इ.

गुढी हा शब्द मूळ संस्कृत भाषेतला नाही. ती गुढी या अर्थी गुढी स्त्री लिंगी आहे. गुढी या शब्दाचा एक अर्थ 'ध्वज' व पताका असाही आहे यात शंका नाही. राज्याभिषेक, सण, उत्सव इतर आनंदाच्या प्रसंगी ध्वज उभारले जात..

आपल्या देशात मातृप्रधान समाजव्यवस्था आधीपासून होती व पुरूषप्रधान व्यवस्था त्यानंतर आली. स्त्रीध्वज पुरूषध्वजाच्या आधीपासून असावा,  पुरूषप्रधान व्यवस्थेने स्त्रीध्वजाचे रूपांतर पुरूषध्वजात केले असावे. 'नमुची' नावाच्या दानवाची स्त्रीसेना असल्याचा उल्लेख वैदिक वाड्·मयात आढळतो. स्त्री सेनेचा ध्वज स्त्रीवस्त्राचाच असण्याची शक्यता अधिक आहे.

गुढीवर पालथा तांब्या हे मानवी मस्तकाचे प्रतिक हे बहुतेकांचे मत बरोबर आहे. गुढी ही साडी, चोळी इ.प्रकारच्या स्त्रीवस्त्रांनी विभूषित असते. आता गुढी हा स्त्री लिंगी शब्द, अंगावर स्त्री वेष, अशा स्थितीत या स्त्री देहावरील मस्तक स्त्रीचेच असणार....

आता ही स्त्री कोण हा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो.

चैत्र महिना व शिवपार्वती यांचा  वर नमूद केलेला संबंध बघता  हे मस्तक पार्वतीचे असावे असे अभ्यासकांना वाटते.

ज्ञानेश्र्वरांच्या दोन ओव्या पहा.

अधऊर्ध्व गुढें काढी । प्राणु नवां पेढी।
बांधोनी घाली उडी । मध्यमेमाझि।। १८.७८६
संकल्पविकल्पाचे लुगडें सांडूनि मन उघडें।
बुध्दि ही मागिलीकडे । उगी बैसे।। १८.७३७

     ज्ञानेश्र्वरांनी येथे 'गुढे' व 'लुगडे' याचा संबंध निःसंदिग्धपणे जोडला आहे., हे पहाता इ.स. च्या 12 व्या शतकात गुढी ही स्त्री वेषाने सजली जात होती. हे स्पष्ट होते. गुढी ही देवी असल्याने तिच्या अंगावर लुगडे असणे,  ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे.

महाराष्ट्रात गुढीची पूजा करून फुलांचा, मिठाईचा हार घातला जातो,  हे सर्व पार्वतीच्या गळ्यातील दागिने आहेत. गाठी 'पुतळ्या' या स्त्री दागिण्यासारख्या आहेत.

गुढीसाठी स्त्रीयांची वस्त्रे वापरणे हा स्त्रीयांचा अनादर नसून मातृसत्ताक समाजपध्दतीमध्ये स्त्रीयांना जे प्राधान्य दिले जाते त्याचे दयोतक आहे. गुढीविषयीचा आदर हा पार्वती विषयी आदर आहे. गुढीची पूजा ही पार्वतीची पूजा आहे. मातेची पूजा आहे.

सण उत्सव म्हणजे उर्जेचे नुतनीकरण

प्राचीन धर्मशास्त्रांनी, समाजशास्त्रांनी खूप चिंतन व निरीक्षण करून सणांची रचना केली.

त्याकाळी एखादया महान स्त्री वा पुरूषाने एखादी असाधारण कृती केली की पुढच्या पिढयांना अनुकरणीय आदर्श मिळे, काळाच्या ओघात तो विस्मरणात जाऊ नये म्हणून दरवर्षी त्याच तिथीस सण किंवा उत्सव साजरा करणे..

थोडक्यात गुढीपाडव्याला गुढी उभीकरण्याची प्रथा शंकर पार्वती यांच्या चारित्र्याशी जवळून निगडित आहे.

प्रश्न ९. भारतात इतरत्र गुढी उभारली जाते का?

चैत्र प्रतिपदा हा उत्सव काश्मीरमध्ये नवरेह, गुजरात मध्ये चैत्र नवरात्र, राजस्थानात गणगौर, दक्षिणेत युगादी, हिमाचलात चैत्ती,  हरियाणात थपना  मणिपूरात मीतेइ....इ प्रकारे साजरा केला जातो..

प्र. १०. गुडीपाडवा व संभाजी महाराज...

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची:  गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी हत्या करून त्यांच्या देहाची विटंबना केली. त्यांच्या शरीरात भूसा भरून अनेक शहरात फिरवून मराठयांच्या स्वाभिमानी, रणझुंजार छत्रपतींची विटंबना केली. त्या वर्षी कुठेही गुढी उभारली गेली नाही. आपल्या घरी ही आपल्या जवळचे आप्त वारल्यास एक वर्ष आपण कोणतेही सण साजरे करत नाही. मराठयांनी याच औरंगजेबाला याच मातीत गाडून छत्रपती संभाजी महाराज हत्येचा बदला घेतला व महाराष्ट्र मोगली पाशातून मुक्त केला.

मला व्यक्तीशः असे वाटते की छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस ११ मार्च आहे तो शौर्य दिन, कृतज्ञता दिन स्वरूपात इंग्रजी तारखेप्रमाणे साजरा करून गुढीपाडवा तिथीप्रमाणे चैत्र प्रतिपदेस साजरा केल्यास हजारो वर्षाच्या परंपरेस व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानास न्याय दिल्यासारखे होईल....

तथापी आपले वेगऴेमत व्यक्त करण्यास आपण स्वतंत्र आहात...

पाडव्यास मुहुर्त न बघता सुर्योदय बरोबर गुढी उभारावी व सुर्यास्तापूर्वी ती काढावी...

संदर्भ.. गुढी आणि शंकर पार्वती लेखक
डॉ.आ.ह साळुंखे तसेच इंटरनेट

श्री गिरीश प्रभाकर कु-हाडे
7798981199
Kurhadegirish@gmail.com

No comments:

Post a Comment